ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला

Foto
मुंबई  : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीकडून मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये एकत्रितरित्या निवडणूक लढवली जाणार आहेत. ठाण्यातही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. ठाण्यात एकूण ४७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात ३ नगरसेवक असतील. फक्त एकाच प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यातील एकूण नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि काँग्रेसलाही सोबत घेतले जाऊ शकते.

संभाव्य जागावाटपानुसार ठाण्यात राज ठाकरे यांच्या मनसेकडून ३१ ते ३४, ठाकरे गट ५० ते ५५ जागा, शरद पवार गट ३५ ते ४० जागा आणि काँग्रेसच्या वाट्याला ५ ते १० जागा येण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला ठाण्यात चांगल्या संख्येने मतं मिळाली होती. त्यामुळे ठाकरे गट ठाण्यात जास्त जागांवर निवडणूक लढवेल. परंतु, अजूनही ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद असलेल्या पाच ते सहा जागांवरुन रस्सीखेच सुरु असल्याने जागावाटप अंतिम झालेले नाही. मुंब्रा, कळवा आणि राबोडी भागात जितेंद्र आव्हाडांच्या रुपाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. त्यामुळे या परिसरातील ३५ ते ४० जागा त्यांच्यासाठी सोडल्या जाऊ शकतात. ठाण्यात इंदिरानगरसह मोजक्या भागांमध्ये अजूनही काँग्रेसला मानणारा मतदारवर्ग आहे. त्यामुळे ५ ते १० जागा या काँग्रेससाठी सोडल्या जातील, असा अंदाज आहे.

राज-उद्धव ठाकरे ठाण्यात भाजपची ती ट्रिक वापरणार?

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पॅटर्न प्रचलित केला आहे. त्यानुसार भाजपने आपले अनेक उमेदवार मित्रपक्षांच्या चिन्हावर लढवून विजयी केले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेतही हाच पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे. ज्याठिकाणी शिवसेना आणि मनसेला एखादी जागा सोडणे शक्य नसेल, पण त्या वॉर्डमध्ये दुसर्‍या पक्षाचा उमेदवाराची ताकद जास्त असेल तर त्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायला सांगितले जाऊ शकते. त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाचे काही उमेदवार इंजिनाच्या चिन्हावर आणि मनसेचे काही उमेदवार मशालीच्या चिन्हावर लढू शकतात. ठाण्यात भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन आणि प्रत्येक वॉर्डातील परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे, हे ठाकरे बंधूंच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ठाण्यात ठाकरे बंधूंकडून शक्य त्या सर्व तडजोडी केल्या जाण्याची शक्यता आहे.